अकोला न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या ५० वर्षांत एकही खड्डा न पडलेला रस्ता पाहणे हे आपल्या देशात खरंच एक आश्चर्य वाटू शकते. पण पुण्यात असा एक रस्ता आहे, जो आजही जसाच्या तसा चांगल्या स्थितीत आहे. या रस्त्याचे नाव आहे जंगली महाराज रोड. रस्ते बांधणीतील गुणवत्ता, सचोटी आणि दूरदृष्टीचा हा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. पावसाळ्यात खड्डे पडणाऱ्या इतर रस्त्यांच्या तुलनेत हा रस्ता एक आदर्श उदाहरण ठरला आहे. हा रस्ता कोणी, कधी आणि कसा बांधला, याचा रंजक इतिहास जाणून घेऊया.
जंगली महाराज रोडचा इतिहास
जंगली महाराज रोड, ज्याला पुणेकर प्रेमाने ‘जेएम रोड’ म्हणतात, हा सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा आहे. हा रस्ता जंगली महाराज मंदिरापासून डेक्कन जिमखाना परिसराला जोडतो. १९७० च्या दशकात या रस्त्याच्या बांधकामाची सुरुवात झाली. १९७२ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता आणि त्यानंतर १९७३ मध्ये आलेल्या पुरामुळे पुण्यातील रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. याच पार्श्वभूमीवर, तत्कालीन २१ वर्षीय नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांनी मुंबईतील रस्त्यांची पाहणी केली. मुंबईत जास्त पाऊस पडूनही रस्ते खराब का होत नाहीत, असा प्रश्न त्यांना पडला.
‘रेकोंडो’ कंपनीने वापरले आधुनिक तंत्रज्ञान
पुण्यातील शहर अभियंत्यांनी श्रीकांत शिरोळे यांना सांगितले की, मुंबईतील काही रस्ते ‘रेकोंडो’ नावाच्या पारसी मालकीच्या कंपनीने ‘हॉट मिक्स’ या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बांधले आहेत. यामुळे हे रस्ते अधिक टिकाऊ आहेत. शिरोळे यांनी लगेचच ‘रेकोंडो’ कंपनीशी संपर्क साधून त्यांना जंगली महाराज रोडचे कंत्राट स्वीकारण्यासाठी तयार केले. सामान्य निविदा प्रक्रियेला फाटा देत, हे काम थेट ‘रेकोंडो’ कंपनीला देण्यात आले.
अट अशी की, १० वर्षे एकही खड्डा पडणार नाही
हे कंत्राट देताना एक खास अट घालण्यात आली होती. ती म्हणजे, रस्ता किमान १० वर्षे खड्डेमुक्त राहील याची कंपनीने लेखी हमी द्यावी. तसेच, या काळात रस्त्याचे कोणतेही नुकसान झाल्यास ते कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय दुरुस्त केले जाईल, असेही लिहून घेण्यात आले. १ जानेवारी १९७६ रोजी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. विशेष म्हणजे, करारानुसार १० वर्षांचा कालावधी संपल्यानंतरही रस्ता चांगल्या स्थितीत होता आणि आजही, ५० वर्षांनंतरही त्याला मोठ्या दुरुस्तीची गरज पडलेली नाही.

५० वर्षांनंतरही एकही खड्डा नाही
१९७० च्या दशकात १५ लाख रुपये खर्च करून बांधलेला हा रस्ता आजही गुणवत्ता, सचोटी आणि दूरदृष्टीचा पुरावा म्हणून ओळखला जातो. त्यावेळी सोन्याचा भाव प्रति तोळा २०० रुपये आणि पेट्रोल प्रति लिटर ८० पैसे होते. हा रस्ता बांधल्यानंतर ‘रेकोंडो’ कंपनीच्या कामाचे कौतुक झाले, पण त्यांना पुन्हा पुण्यात दुसऱ्या कोणत्याही रस्त्याचे कंत्राट मिळाले नाही. श्रीकांत शिरोळे यांनी भ्रष्टाचाराला थारा न देता, गुणवत्तेला प्राधान्य दिल्याचे यातून दिसून येते.