अकोला न्यूज नेटवर्क
पुणे : जीवाश्म इंधनांच्या वाढत्या आयातीमुळे देशाची अर्थव्यवस्था आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यायी इंधनांच्या वापराला चालना देण्याचे आवाहन केले आहे. ‘आता गरिबांच्या पैशातून रस्तेनिर्मिती…’ असे वक्तव्य करत त्यांनी देशातील गरिबांचा पैसा इंधनाच्या आयातीवर खर्च होत असल्याची खंत व्यक्त केली. जागतिक जैवइंधन दिनानिमित्त प्राज इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी जैवइंधनाचे महत्त्व, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणारे सकारात्मक परिणाम आणि भारताला ऊर्जा निर्यात करणारा देश बनवण्याचे ध्येय यावर सविस्तर भाष्य केले.
वाढत्या इंधन आयातीमुळे देशावर आर्थिक भार भारतामध्ये जीवाश्म इंधनाची आयात मोठ्या प्रमाणात होत आहे. यासाठी वर्षाला सुमारे १६ लाख कोटी रुपये खर्च होतात. हा पैसा गरिबांच्या विकासावर, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर खर्च केला जाऊ शकतो, असे गडकरी म्हणाले. त्यामुळे, पर्यायी इंधनांचा वापर वाढवून ही आयात कमी करणे देशासाठी अत्यंत आवश्यक आहे. डिझेलमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते, त्यामुळे आपसोमिथेनॉलसारखे स्वच्छ आणि शाश्वत पर्याय शोधणे महत्त्वाचे आहे. भविष्यात हे पर्याय देशासाठी वरदान ठरतील, असेही त्यांनी सांगितले.
शेतकरी आता इंधनदाता बनणार सध्या देशातील ६५ टक्के जनता कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, पण सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा अवघा १२ ते १४ टक्के आहे. या असंतुलनाला दूर करण्यासाठी पर्यायी इंधन एक चांगला उपाय ठरू शकतो. भारतात गरजेपेक्षा जास्त अन्नधान्याचे उत्पादन होत असल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. मात्र, जैवइंधनामुळे शेतकरी आता केवळ अन्नधान्य उत्पादक न राहता ‘इंधनदाता’ बनत आहेत. ऊस, बांबू, मका यांसारख्या पिकांपासून इथेनॉल आणि इतर जैवइंधने तयार केल्यास शेतकऱ्यांच्या टाकाऊ शेतमालालाही चांगली किंमत मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
वाहनांमध्ये पर्यायी इंधनांचा वापर आवश्यक गडकरींनी वाहन उद्योगाला पर्यायी इंधनांना अनुकूल अशी वाहने तयार करण्याचे आवाहन केले. इथेनॉल, हायड्रोजन, बायो-सीएनजी आणि बायो-डिझेल यांसारख्या इंधनांचा वापर वाढल्यास देशाची इंधन आयात कमी होईल आणि देशातील शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यांनी सांगितले की, टोयोटा आणि हीरो मोटोकॉर्पने आधीच फ्लेक्स-इंजिन आणि बायो-इंधन वापरणाऱ्या गाड्या बाजारात आणल्या आहेत. भविष्यात सर्वच वाहन उत्पादकांनी या दिशेने काम करणे महत्त्वाचे आहे.

ऊर्जा निर्यात करणारा देश बनण्याची क्षमता भारताकडे इथेनॉल, हायड्रोजन आणि बांबू यांसारख्या इंधनांच्या निर्मितीची मोठी क्षमता आहे. यामुळे भारत ऊर्जा निर्यात करणारा देश बनू शकतो. संशोधन, नवनवीन कल्पना आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून पर्यायी इंधनावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास ‘आत्मनिर्भर भारता’चे स्वप्न साकार होऊ शकते. पर्यायी इंधनामुळे जगभरात भारतामुळे परिवर्तन घडण्याची शक्यता आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमातील मान्यवर या कार्यक्रमात प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपाध्यक्ष विक्रम गुलाटी, हीरो मोटोकॉर्पच्या ऑपरेशन्स विभागाचे कार्यकारी संचालक विक्रम कसबेकर, किर्लोस्कर ब्रदर्सचे व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी आणि प्राजच्या बायो-एनर्जी विभागाचे अध्यक्ष अतुल मुळे हे उपस्थित होते.