अकोला न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे पालकमंत्री असलेल्या वाशिम जिल्ह्यातील उच्च पदस्थ महिला कृषी अधिकाऱ्यानं शेतकऱ्यावर अरेरावी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एवढच नव्हे तर या घटनेचं चित्रीकरण करणाऱ्या शेतकऱ्याचा मोबाईलही त्या महिला अधिकाऱ्यानं हिसकावून घेतला आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाशिमच्या कृषी अधीक्षक कार्यालयाअंतर्गत असलेल्या आत्मा विभागात शाश्वत शेती दिनाच्या निमित्तानं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.मात्र या कार्यक्रमात शेतकऱ्यांना देण्यात येणारं जेवण अपुरं पडल्यामुळं बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र शेतकऱ्यांनी जेव्हा अधिकाऱ्यांना विचारणा केली तेव्हा आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे या शेतकऱ्यांवर एकदम भडकल्या आणि याचे चित्रीकरण करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर त्या धावून जाऊन त्यांनी तो मोबाईलही हिसकावून घेतला.
घडलेल्या प्रकाराविषयी माध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं सांगत अनिसा महाबळे यांच्याकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अशा मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.