मुंबई : नवे आर्थिक वर्ष सुरू होताच, अनेक ठिकाणी नियमांमध्ये बदल होतात. याच पार्श्वभूमीवर, गेल्या काही दिवसांपासून एक मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात आला आहे की रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबरनंतर एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा मिळणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या अफवांमुळे लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, सरकारने यावर स्पष्टीकरण देत हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
सरकारने केला खुलासा अनेक माध्यमांनी ५०० रुपयांच्या नोटा एटीएममधून मिळणार नाहीत, असा दावा केला होता. यावर अर्थ मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, लहान मूल्याच्या नोटा लोकांना सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी आरबीआयने सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरना निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटांची संख्या ७५ टक्के आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत ही संख्या ९० टक्क्यांपर्यंत वाढवावी, असे सांगितले आहे.
याचा अर्थ ५०० रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचा सरकारचा कोणताही उद्देश नाही. उलट, एटीएममध्ये कमी मूल्याच्या नोटांची संख्या वाढवून सामान्य नागरिकांची सोय करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे, सरकारने स्पष्ट केले आहे की, एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा मिळणे बंद होणार नाही.
हे पाऊल का उचलण्यात आले? ५ ऑगस्ट २०२५ रोजी राज्यसभेच्या अधिवेशनादरम्यान, वाय. वेंकट सुब्बा रेड्डी आणि मिलिंद देवरा या सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी म्हटले होते की, दैनंदिन व्यवहारांमध्ये सामान्य लोकांना अडचणी येऊ नयेत यासाठी आरबीआयने बँकांना एटीएममध्ये कमी मूल्याच्या नोटा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले होते. जेव्हा आर्थिक व्यवहारांमध्ये समस्या येतात, तेव्हा आरबीआय वेळोवेळी बँकांना सूचना देते. मात्र, अनेक वेळा अशा बनावट अहवालांमुळे लोकांना सरकार मोठ्या मूल्याच्या नोटांवर बंदी घालत आहे, असा संशय येतो. या पार्श्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे.

सरकारने लोकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही माहितीची पडताळणी अधिकृत स्रोतांद्वारे करावी.