अकोला न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यांमधून राजकारण आणि सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी ‘वय वर्षे ७५’ च्या मुद्द्यावरून त्यांनी केलेल्या विधानावरून मोठी चर्चा सुरू असतानाच, आता त्यांनी ‘सगळे प्रयत्न संपल्यावर लोक सामान्य जनतेकडे जातात’ असे सूचक विधान केले आहे. या विधानामुळे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच हा इशारा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
७५ वर्षांवरील नेतृत्वाचा मुद्दा काही दिवसांपूर्वी डॉ. भागवत यांनी ७५ वर्षांवरील नेत्यांना शाल दिली जाते, याचा अर्थ त्यांनी आता इतरांना संधी द्यावी, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला विरोधकांनी, विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यासाठी हत्यार बनवले. पंतप्रधान मोदी सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षांचे होणार असल्याने, हे वक्तव्य त्यांच्यासाठीच असल्याचे मानले जात आहे. यानंतर, दीनदयालनगर येथील श्री पाण्डुरंगेश्वर शिव मंदिरात बोलताना डॉ. भागवत यांनी पुन्हा एकदा सरकारला आरसा दाखवणारे विधान केले.
शिवाच्या उदाहरणातून शिकवण श्री पाण्डुरंगेश्वर शिव मंदिरात दिलेल्या भेटीत सरसंघचालकांनी भगवान शंकराच्या उदाहरणातून समाजाला आणि सत्ताधाऱ्यांना एक महत्त्वाचा संदेश दिला. ते म्हणाले की, भगवान शंकरामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, तरीही ते विरक्त वृत्तीचे आहेत. भौतिक सुखांपासून ते कायम दूर राहिले आणि जगाच्या कल्याणासाठी त्यांनी विषही प्राशन केले. मात्र, आजच्या समाजात ‘चांगले दिवस आल्यामुळे आपल्याला काहीतरी मिळावे’ ही प्रवृत्ती वाढत आहे. ही प्रवृत्ती शिवाला मान्य नाही. सामान्य जनांना धोका होईल ते अंगावर घेणे हा शिवाचा स्वभाव आहे आणि असे जीवन जगण्याची आज गरज आहे.
हावरटपणा आणि स्वार्थी वृत्तीवर टीका डॉ. भागवत यांनी समाजातील वाढत्या हावरटपणा आणि स्वार्थी वृत्तीवरही तीव्र टीका केली. ‘माणसाच्या हावरटपणामुळे आज समाजात अनेक संकटे आहेत. त्याच्यातील कट्टरपणामुळे राग, द्वेष वाढत असून लढाया, युद्ध होत आहेत,’ असे ते म्हणाले. ‘मला मिळाले पाहिजे, बाकीच्यांना मिळाले नाही तरी चालेल’ ही स्वार्थी वृत्ती वाढत आहे. ही मनुष्याची ‘काळी बाजू’ आहे, जी बदलणे आवश्यक आहे. शिवाची पूजा करणे म्हणजे ही स्वार्थी प्रवृत्ती बदलणे होय. मला काही नको, साधेपणाने राहणे आणि करुणा हा भाव प्रत्येकात असणे आवश्यक आहे. आपला उपयोग जगासाठी अधिक व्हावा, हीच खरी शिववृत्ती आहे.

जनतेच्या मनात आले तरच परिवर्तन श्रावण महिन्यात सगळे शिवाची भक्ती करतात, कारण शिव हे सामान्य जनतेचे प्रतीक आहे, असे डॉ. भागवत म्हणाले. त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडताना सांगितले की, ‘सगळे प्रयत्न संपल्यावर लोक सामान्य जनतेकडे जातात. जनतेच्या मनात आले तरच कामे होतात.’ बुद्धिवादी लोक जगात परिवर्तन होत असल्याचे सांगतात. हे ओळखून माणसाने योग्य पावले उचलली नाहीत तर विनाश अटळ आहे. मात्र, जर योग्य वेळी काळ ओळखला तर एक नवीन आणि उन्नत समाज उभा राहील, असे आशादायी विधानही त्यांनी केले. या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जनतेकडे दुर्लक्ष करू नये, असा अप्रत्यक्ष संदेशच त्यांनी दिला आहे.