अकोला न्यूज नेटवर्क
अकोला: भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचं प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण यंदा ९ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. हिंदू पंचांगानुसार, श्रावण पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. यंदा पौर्णिमा तिथी ८ ऑगस्ट रोजी दुपारी सुरू होत असल्याने, रक्षाबंधन ८ तारखेला करायचं की ९ तारखेला, असा संभ्रम अनेक लोकांमध्ये होता. मात्र, अकोला येथील पुरोहित संघाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे होणार असून, त्यासाठीचा शुभमुहूर्त दुपारी १.२४ पूर्वीचा आहे.
रक्षाबंधनाची योग्य तिथी
अकोला पुरोहित संघाची बैठक श्री बालाजी मंदिरात झाली. यामध्ये सिंधू ग्रंथांच्या आधारावर रक्षाबंधनाचे मुहूर्त निश्चित करण्यात आले. यानुसार, नारळी पौर्णिमा तिथी ८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी सुरू होणार असून, ती ९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून २१ मिनिटांपर्यंत आहे. उदय तिथीनुसार ९ ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करणे योग्य ठरेल, असे पुरोहित संघाकडून स्पष्ट करण्यात आले.
यंदा भद्राकाळची चिंता नाही
या वर्षीच्या रक्षाबंधन पौर्णिमेला भद्राकाळ नसणार आहे. त्यामुळे कोणताही संकोच न बाळगता तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. भद्राकाळात राखी न बांधण्यामागे एक पौराणिक कथा आहे. असे मानले जाते की, रावणाच्या बहिणीने त्याला भद्राकाळातच राखी बांधल्याने त्याचा विनाश झाला. म्हणूनच, भावाच्या सुख-समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी भद्राकाळात राखी बांधली जात नाही. यंदा भद्राकाळ नसल्याने राखी बांधण्यासाठी चांगला काळ आहे.
रक्षाबंधनाचे शुभमुहूर्त
रक्षाबंधन अर्थात राखी बांधण्याचा शुभमुहूर्त सकाळी ५.४७ पासून सुरू होणार असून, तो दुपारी १.२४ पर्यंत आहे. एकूण सात तास १० मिनिटांचा हा शुभकाळ आहे. या वेळेमध्ये तुम्ही राखी बांधू शकता. विशेषत: सकाळी ७.३७ पासून ९.१४ पर्यंतचा काळ शुभ मानला जातो. या व्यतिरिक्त, दुपारी १२.२७ ते १.२४ पर्यंत चंचल मुहूर्त आहे आणि दुपारी १२.३ ते १२.५१ पर्यंत अभिजीत मुहूर्तावरही रक्षाबंधन संपन्न करता येईल. पौर्णिमा तिथी दुपारी १.२४ पर्यंत असल्यामुळे, या वेळेपर्यंत राखी बांधणे अधिक योग्य आहे. तरीही, लोकपरंपरेनुसार आणि कुल प्रथेनुसार काही ठिकाणी दुपारी १.२४ नंतरही राखी बांधली जाते.

रक्षाबंधनाचा खरा अर्थ
रक्षाबंधनाचा मूळ उद्देश म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि कर्तव्यभावना. बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते, त्यामागे एक गहन भावना असते की तिचा भाऊ नेहमी समृद्ध राहो आणि तिचं रक्षण करो. या सणामध्ये बहीण भावाच्या कल्याणासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. हाच या सणाचा खरा गाभा आहे.