अकोला : जालना येथे आमदार अर्जुन खोतकर यांनी हिंदू खाटीक समाजाविषयी वापरलेली भाषा समाजमनावर घाव घालणारी ठरत असून, त्यांच्या वक्तव्यावरून आता राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अकोल्यासह विविध जिल्ह्यांतून खोतकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी तीव्र होत आहे.
अपशब्दांनी सामाजिक सलोखा बिघडला:
राजकीय चर्चेदरम्यान खोतकर यांनी केलेले अपमानास्पद आणि जातीय विधान केवळ खाटीक समाजापुरते मर्यादित न राहता संपूर्ण मागासवर्गीयांमध्ये रोष निर्माण करणारे ठरले आहे. त्यांच्या शब्दांचा उपयोग समाजात तेढ वाढवणारा आहे, असा आरोप करण्यात येत आहे.
खाटीक समाजाचा संतप्त निषेध:
हिंदू खाटीक समाज परंपरेने संयमी आणि सर्वसमावेशक भूमिका घेणारा असूनही, खोतकर यांच्यामुळे समाजाची प्रतिष्ठा आणि भावनांना ठेच पोहचली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
राजकीय जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह:
अर्जुन खोतकर हे जनतेचे प्रतिनिधी असूनही, त्यांनी सार्वजनिकरित्या जातीय समाजावर खालच्या पातळीचे वक्तव्य करणे म्हणजे घटनात्मक जबाबदारीचा अपमान असल्याचे मत नोंदवले जात आहे. त्यामुळे त्यांची विधानसभेची सदस्यता रद्द करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन:
या पार्श्वभूमीवर सकल हिंदू खाटीक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आले आहे. सरकार व कायदा यंत्रणांनी तत्काळ कारवाई करावी, अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.