अकोला न्यूज नेटवर्क
अकोला: अन्नधान्य वितरण कार्यालय म्हणजे शासनाच्या विविध योजनांचा केंद्रबिंदू, मात्र अकोल्यातील हेच कार्यालय सध्या नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना येथे अपार असुविधा सहन कराव्या लागत आहेत.
बसण्यासाठी जागेचा अभाव :
दररोज अनेक वृद्ध महिला आणि ज्येष्ठ नागरिक राशन कार्डाशी संबंधित कामांसाठी या कार्यालयात येतात. मात्र, कार्यालयात बसण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने त्यांना जमिनीवरच बसून तासन्तास प्रतीक्षा करावी लागते.
निवाऱ्याचा अभाव, पावसात थांबण्याची मजबुरी :
या कार्यालयात प्रतीक्षा कक्ष, छताखाली जागा किंवा किमान टेबल-खुर्च्याही उपलब्ध नाहीत. पावसाच्या दिवसात हे दृश्य अधिकच वेदनादायक ठरत आहे.
शासनाच्या योजनांसाठी आलेल्या नागरिकांना त्रास:
नवीन कार्ड, हरवलेले कार्ड मिळविणे, दुरुस्ती करणे यांसाठी आलेल्या नागरिकांना यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असूनही दुर्लक्ष :
हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच असूनही अशा अवस्थेत का आहे, याचा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाला हे चित्र नजरेस पडत नाही का, असा संतप्त सूर नागरिकांमध्ये दिसून येतो.
नागरिकांची मागणी :
तत्काळ खुर्च्या, पाण्याची सुविधा, आणि स्पष्ट माहिती फलक उपलब्ध करून नागरिकांसाठी सुसज्ज व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.