WhatsApp

व्हीव्हीपॅटशिवाय होणार झेडपी, महापालिका निवडणुका; निवडणूक आयुक्तांचा स्पष्ट निर्णय

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नाशिक :
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून तयारीला वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नाशिक येथे बैठक घेऊन पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकांची माहिती दिली. विशेष म्हणजे झेडपी, महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये VVPAT (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल) मशिन वापरण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.



व्हीव्हीपॅट मशिन वापरणार नाहीत
वाघमारे यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतमोजणीची जबाबदारी मोठी असून, सर्व निवडणुका एकत्र घेतल्यास मनुष्यबळ अपुरं पडेल. त्यामुळे निवडणुका टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील. या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशिन वापरण्याची व्यवस्था होणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

निवडणूक तयारीची प्राथमिक माहिती
नाशिक विभागात ५०.४५ लाख मतदार असून, ४,९८२ मतदान केंद्रे असतील. यासाठी ८,७०५ कंट्रोल युनिट आणि १७,००० मतदार यंत्रांची गरज भासणार आहे. दिवाळीनंतर निवडणुकांची अधिसूचना जारी होण्याची शक्यता असून, ऑक्टोबर अखेर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल, असे वाघमारे यांनी सांगितले.

VVPAT नसेल यावरून विरोधक आक्रमक
व्हीव्हीपॅट मशिन न वापरण्याच्या निर्णयावर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “हा निर्णय निव्वळ तुघलकी नाही, तर निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उभं करतो. व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय घेताय म्हणजे निवडणुकीचा फार्सच करा, निवडणूक नको,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

ईव्हीएम यंत्रांची चाचणी यशस्वी
दरम्यान, विधानसभेच्या २०२४ निवडणुकांनंतर झालेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन चाचण्यांमध्ये कोणताही दोष आढळला नसल्याचे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. १० विधानसभा मतदारसंघांमध्ये केलेल्या तपासणीच्या निष्कर्षानुसार सर्व यंत्रे सुस्थितीत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!