WhatsApp

एसटी महामंडळाचं डिजिटल पाऊल; ‘छावा राईड’ अ‍ॅपने होणार प्रवास सुलभ

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शासनाच्या प्रवासी सेवेला डिजिटल स्वरूप देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले असून, राज्य सरकार आणि एसटी महामंडळाच्या सहकार्याने ‘छावा राईड’ हे नव्याने विकसित केलेले अधिकृत प्रवासी अ‍ॅप लवकरच सुरू होणार आहे. या अ‍ॅपद्वारे प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह व पारदर्शक सेवा मिळणार असून मराठी तरुण-तरुणींना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे.



सरकारी अ‍ॅपचा उद्देश स्पष्ट
परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी कंपन्यांच्या मक्तेदारीतून प्रवासी व चालकांची सुटका व्हावी, त्यांना सन्माननीय दरात सेवा मिळावी यासाठी हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. “छावा राईड” हे अ‍ॅप बस, रिक्षा, टॅक्सी व ई-बस सेवांसाठी एकात्मिक असेल.

मराठी तरुणांसाठी रोजगार व आर्थिक पाठबळ
या अ‍ॅपच्या माध्यमातून मराठी युवक-युवतींना ड्रायव्हिंग, सेवा व्यवस्थापन व टेक्निकल सहाय्यासारख्या अनेक क्षेत्रांत रोजगार मिळणार आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर यांनी अ‍ॅपद्वारे रोजगार मिळवणाऱ्यांना विशेष आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे.

नामवंत नेत्यांची संमती आणि सहकार्य
या अ‍ॅपसाठी “जय महाराष्ट्र”, “महा-राईड”, “महा-यात्री”, “महा-गो” अशा अनेक नावांवर चर्चा झाली. मात्र, अखेर “छावा राईड” हे नाव एकमताने ठरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अंतिम मंजुरीनंतर अ‍ॅप लवकरच कार्यान्वित होणार आहे.

प्रवासी आणि चालक दोघांनाही फायदा
हे अ‍ॅप केवळ प्रवाशांसाठी नव्हे, तर चालकांसाठीही फायदेशीर ठरणार आहे. पारदर्शक दर, अचूक लोकेशन ट्रॅकिंग, महिला प्रवाशांसाठी विशेष सुरक्षा सुविधा यामुळे ही सेवा खासगी अ‍ॅप्सच्या तुलनेत अधिक विश्वासार्ह ठरण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!