अकोला न्यूज नेटवर्क
नागपूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाचे नाट्य रचत आठ पुरुषांना विवाहाच्या जाळ्यात ओढून ५० लाखांची फसवणूक करणारी ‘लुटेरी दुल्हन’ समीरा फातिमा अखेर नागपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकली. सिव्हिल लाईन्स परिसरात एका टपरीवर चहा घेताना तिला गिट्टीखदान पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली.
प्रेमाच्या आमिषाने सापळा
समीरा सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय होती. ती स्वतःला शिक्षिका असल्याचं भासवायची. “माझा घटस्फोट झालाय, मला आधार हवा” असं सांगून विवाहित पुरुषांना भावनिक जाळ्यात ओढायची. निकाहनंतर काही आठवड्यांत भांडणं उकरून काढायची व खोट्या गुन्ह्यांची धमकी देऊन पैसे उकळायची.
व्यावसायिकाला लक्ष्य, बलात्काराचा खोटा आरोप
मार्च २०२३ मध्ये ट्रॅव्हल व्यावसायिक गुलाम गौस पठाण याने तिच्याविरोधात पहिली तक्रार दाखल केली होती. समीरा फातिमाने त्याच्याशी निकाह केला, मात्र नंतर सतत पैशासाठी धमक्या, आणि अखेर बलात्काराचा खोटा आरोप करत मोठी रक्कम सेटलमेंटसाठी मागितली.
गुन्ह्यांची मालिका आणि पथकाच्या अचूक कारवाईने पडदाफाश
पोलिस तपासात आतापर्यंत आठ विवाह आणि एकूण ५० लाखांची फसवणूक उघड झाली आहे. ती सतत ठिकाणं बदलून पोलिस तपास चुकवत होती. न्यायालयीन प्रक्रियेचा गैरफायदा घेत ती एकाही प्रकरणात ठोस शिक्षा होऊ देत नव्हती.

शिक्षकाच्या प्रतिमेवर डाग
तिच्या शिक्षिका असल्याच्या दाव्यामुळे समाजात शिक्षक वर्गाच्या प्रतिमेलाही धक्का बसला आहे. समाजात शिक्षकांकडून नैतिकता अपेक्षित असते, मात्र अशा प्रकारच्या वागणुकीमुळे विश्वासाला तडा जातोय.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
समीरा फातिमाला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, गिट्टीखदान पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी इतर फसवणूक झालेल्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.