अकोला न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर | बी. फार्मसीच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थिनीने एका तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. “माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर तुझे खासगी फोटो तुझ्या घरी पाठवून बदनाम करीन,” अशी वारंवार धमकी देणाऱ्या सुरज उर्फ शुभम मोरे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणी वायाळने मैत्रिणीच्या रुमवर घेतला अखेरचा श्वास
एन-7, ग्रीव्हज कॉलनी येथील रुमवर कल्याणी तिच्या मैत्रिणीसोबत राहत होती. 30 जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास तिने गळफास लावून आत्महत्या केली. बहिणीला याबाबत मैत्रिणींनी फोन करून कळवले. प्रतिक्षा वायाळने लगेच संपर्क साधला असता, पोलिसांनी तिच्या बहिणीच्या आत्महत्येची माहिती दिली.
लग्नासाठी जबरदस्ती आणि धमक्या
कल्याणीची सुरज मोरेशी ओळख चार-पाच वर्षांपासून होती. सुरजने लग्नासाठी तगादा लावत तिला धमक्या देण्यास सुरुवात केली होती. “तुझ्या आणि माझ्या फोटोचा वापर करून तुला बदनाम करीन,” अशी धमकी देत तो तिच्यावर मानसिक ताण वाढवत होता, अशी माहिती प्रतिक्षा वायाळ हिने दिली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी सांगितला त्रास, पण…
मृत्यूपूर्वी सावरगाव येथे आलेली कल्याणी त्रस्त आणि खचलेली होती. मोठ्या बहिणीने विचारल्यावर तिने सुरजच्या त्रासाची कबुली दिली. “आई-बाबांना सांगू नकोस, मी रक्षाबंधनानंतर गावातच राहीन,” असं म्हणत तिने बहिणीला समजावण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिस तपास सुरू; आरोपीवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर सिडको पोलिस ठाण्यात सुरज मोरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल रमेश नेनेकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. कल्याणीच्या आत्महत्येमागील नेमका मानसिक छळ व जबाबदार व्यक्तीच्या कृत्याचा तपशील समोर येण्याची शक्यता आहे.