अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींच्या निर्दोष सुटकेनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या ‘सनातनी दहशतवाद’ या उल्लेखावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादग्रस्त विधानात आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट उडी घेत, चव्हाणांच्या भूमिकेचे समर्थन करत एक धगधगतं वक्तव्य केलं आहे. “जोवर जातीव्यवस्था आहे, तोवर सनातनी दहशतवाद विसरता येणार नाही,” असं ते म्हणाले आहेत.
इतिहासभर चालत आलेला सनातनी दहशतवाद – आव्हाडांचा आरोप
आव्हाड यांनी भगवान बुद्ध, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीमाई फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, गांधी, नरेंद्र दाभोलकर यांचा उल्लेख करत, “या सर्वांवर अन्याय करणारे, त्यांना छळणारे, हत्या करणारे ‘सनातनी दहशतवादी’च होते,” असा थेट आरोप केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि मनुस्मृतीवाले
“भारतीय संविधान हे सनातनी मानसिकतेविरोधात होतं. पण आजही मनुस्मृतीला सर्वोच्च मानणारे लोक या देशात आहेत. अशांना जर ‘सनातनी दहशतवादी’ म्हणायचं नसेल तर काय म्हणायचं?” असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला.
राजकीय समिकरणांवर परिणाम
पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानानंतर काँग्रेस बचावाच्या भूमिकेत गेली असतानाच आव्हाड यांच्या या समर्थनामुळे महाराष्ट्रात ‘सनातन धर्म’ विरुद्ध ‘प्रबोधन चळवळ’ असे नवे राजकीय परिमाण तयार होण्याची शक्यता आहे. भाजप आणि संघ विचारसरणीच्या नेत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकाच पक्षात दोन मतप्रवाह?
एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट या मुद्द्यावर एकत्र राहतील की नाही, याकडे आता लक्ष लागलं आहे. कारण, ‘सनातनी दहशतवाद’ हा शब्द स्वतःस धर्मनिष्ठ मानणाऱ्या वर्गाच्या भावनांना दुखावणारा ठरू शकतो.