अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी स्वतंत्रपणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर केवळ चार तासांत अमित शाह राष्ट्रपती भवनात पोहोचल्याने ५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मोठे उधाण आले आहे.
५ ऑगस्टचा राजकीय इतिहास आणि संभाव्य निर्णय
५ ऑगस्ट ही तारीख भाजपसाठी निर्णायक मानली जाते. २०१९ मध्ये याच दिवशी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. त्याच वर्षी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनही ५ ऑगस्टलाच पार पडले होते. त्यामुळे पुन्हा एकदा या दिवशी केंद्र सरकारकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
युसीसी आणि इतर संवेदनशील विधेयकांची शक्यता
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, पावसाळी अधिवेशनात समान नागरी संहिता (UCC) सारखे संवेदनशील विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. आसाम आणि गुजरातमध्ये युसीसीबाबत हालचाली सुरू असून भाजपच्या दीर्घकालीन अजेंड्यातील हा शेवटचा उरलेला मुद्दा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोदी-शाह यांची राष्ट्रपतींशी झालेली भेट आणि ५ ऑगस्टची तारीख यांची जुळवाजुळव अनेक शक्यता निर्माण करत आहे.
या बैठकीनंतर राष्ट्रपती भवन किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. त्यामुळे चर्चांना अधिक उधाण आले आहे. बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या प्रमुखांबाबतचे बदल, माजी उपराष्ट्रपतींचा राजीनामा, तसेच आगामी निवडणुकांवरील तयारी, यावरही या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.