WhatsApp

इंस्टाग्रामवर नकली नोटांचे जाळं! अकोल्यातील तरुणांना १० लाख रुपयांचे आमिष

Share

अकोला न्यूज नेटवर्क
अकोला : सोशल मीडियावरून सुरू झालेल्या सायबर गुन्ह्यांच्या साखळीत आता अकोल्यातील तरुणांना निशाणा बनवत इंस्टाग्रामच्या माध्यमातून नकली नोटांचे रॅकेट सक्रिय झाले आहे. ‘१ लाखात १० लाख रुपये मिळवा’ असे आमिष दाखवत, ५००, २०० आणि १०० रुपयांच्या डुप्लिकेट नोटांची विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे.



या रॅकेटमध्ये इंस्टाग्रामवरून संदेश पाठवून ‘हाय क्वालिटी डुप्लिकेट नोटा’ स्वस्तात उपलब्ध असल्याचा दावा केला जातो. यामध्ये WhatsApp नंबर, टेलिग्राम चॅनेल आणि थेट व्यवहारासाठी लिंक पाठवून तरुणांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या व्यवहारात सहभागी होणे म्हणजे गंभीर गुन्ह्यांना आमंत्रण देण्यासारखे आहे. बनावट नोटा तयार करणे, त्याचा व्यवहार करणे हे फक्त फसवणूकच नाही, तर देशद्रोहाच्या गुन्ह्यांतही मोडते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

अनेक तरुण ‘झटपट श्रीमंत होण्याच्या’ आमिषाला बळी पडण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे. अशा कोणत्याही संदेश, लिंक अथवा व्यवहाराची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ सायबर पोलिसांशी किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी काय करावे?

  • सोशल मीडियावर आलेल्या अशा संदेशांकडे दुर्लक्ष करा
  • कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
  • तात्काळ सायबर पोलिसांना माहिती द्या
  • या प्रकारांची माहिती आपल्या मित्र-परिवारात शेअर करा

बनावट चलन वापरणे हे कायद्यानुसार गुन्हा असून त्यासाठी जन्मठेपेची शिक्षाही होऊ शकते, असे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ‘कमी खर्चात जास्त पैसे’ या लालसेपासून दूर राहणे हाच सुजाण नागरिक म्हणून खरा मार्ग आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!