WhatsApp

पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावरून मुंबईत तणाव; शिंदेसेनेचा काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मोर्चा टिळक भवनापासून सुमारे १०० मीटर अंतरावरच थांबवला.



या आंदोलनात माजी खासदार राहुल शेवाळे, मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे, शायना एन.सी. यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिंदेसेना नेत्यांनी काँग्रेसवर हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी “हिंदू धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही”, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

राहुल शेवाळे यांनी आरोप केला की, “मालेगाव प्रकरणात कोर्टाने आरोपींना निर्दोष घोषित केल्यानंतरही काँग्रेस नेत्यांनी सनातन धर्मावर टीका केली. वारंवार हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे.” मनीषा कायंदे यांनीही कोर्टाच्या निकालानंतर काँग्रेसच्या भगवा दहशतवाद शब्दप्रयोगाची आठवण करून देत काँग्रेसवर खोटं प्रचार करण्याचा आरोप केला.

दुसरीकडे, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पलटवार करत म्हटले की, “दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो. हिंदू धर्माचा अपमान करणं काँग्रेसच्या भूमिकेत नाही. उलट शिंदेसेनेच्या नेत्यांनी आपल्या वर्तनामुळेच समाजात गैरसमज निर्माण केले आहेत. पैशांचे व्हिडीओ, अपमानास्पद भाषा आणि सत्तेसाठी केलेली घुसखोरी, यावरूनच त्यांची पत किती खाली गेली आहे हे स्पष्ट होतं.”

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या वक्तव्यात त्यांनी स्पष्ट केलं होतं की, “भगवा हा पवित्र आहे. त्याचा अपमान होऊ नये, म्हणून ‘सनातन दहशतवाद’ हा शब्द वापरणे योग्य ठरेल.”

या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेच्या आंदोलनामुळे मुंबईत राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून काँग्रेस-शिवसेना यांच्यातील वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!