अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली – “फिडे महिला विश्वचषक हा किताब भारतात आला, हेच माझ्यासाठी सर्वांत मोठं समाधान आहे,” असं मत जगज्जेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने शुक्रवारी व्यक्त केलं. केंद्रीय क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
१९ वर्षीय नागपूरची बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने नुकत्याच जॉर्जियामधील बटुमी येथे झालेल्या फिडे महिला विश्वचषकात वरिष्ठ सहकारी कोनेरू हम्पीला पराभूत करत इतिहास रचला. फिडे महिला विश्वचषक जिंकणारी ती सर्वांत कमी वयाची भारतीय बुद्धिबळपटू ठरली आहे.
सत्कार प्रसंगी बोलताना दिव्या म्हणाली, “कोण जिंकलं, यापेक्षा किताब भारतात येणं महत्त्वाचं होतं. हम्पी ताईने उत्कृष्ट खेळ केला, पण मी नशीबवान होते की विजय माझा झाला.” पुढे बोलताना तिने सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हटलं, “मंत्र्यांकडून सन्मानित होणं खूप प्रेरणादायी आहे. अशा प्रोत्साहनामुळे आम्हाला वाटतं की देश आमच्या पाठीशी आहे.”
डॉ. मांडवीया यांनी दिव्याचे कौतुक करत म्हटलं, “महिला विश्वचषकातील ही कामगिरी देशाच्या क्रीडाशक्तीचे दर्शन घडवते. अशा ग्रँडमास्टर्समुळे पुढची पिढी प्रेरणा घेईल.” त्यांनी कोनेरू हम्पीच्या योगदानाचाही गौरव केला.
दिव्या देशमुखच्या या ऐतिहासिक विजयामुळे भारताला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात अभिमानाची नवी भर मिळाली आहे.