अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई – महाराष्ट्र गृह विभागाने गुरुवारी रात्री राज्यभरातील सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) आणि पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) दर्जाच्या एकूण ६५ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. यामध्ये मुंबईतील नऊ सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश असून, ठाणे, पुणे ग्रामीण आणि मिरा भाईंदर-वसई विरार आयुक्तालयातील काही प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्याही या आदेशात आहेत.
मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बागडे, शशिकांत भोसले, सचिन जायभाय, मनिषा रावखंडे, कुसुम वाघमारे, योगेश गावडे, भागवत सोनावणे, शैलेश सणस आणि प्रिया पाटील यांची बदली करण्यात आली आहे. तसेच पोलीस उपअधीक्षक निलम व्हावळ यांचीही नियुक्ती दुसऱ्या ठिकाणी करण्यात आली आहे.
या आदेशानुसार, पुणे ग्रामीणचे तानाजी बर्डे व ठाण्याचे उत्तम कोळेकर यांची बदली मुंबईत करण्यात आली आहे. तसेच ठाण्यातून ममता डिसुझा यांच्यासह, मिरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील दीपाली खन्ना व विजयकुमार मराठे यांचीही बदल्यांमध्ये नावे आहेत.
राज्यात पोलीस बदल्यांचे सत्र सुरूच असून, आगामी काळात आणखी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गृह विभागाच्या या निर्णयामुळे अनेक पोलीस ठाण्यांमध्ये नवीन नेतृत्व येणार असून, स्थानिक कामकाजातही बदल दिसून येण्याची अपेक्षा आहे.