WhatsApp

शिवप्रतिमेची विटंबना ताजी असतानाच नवा तणाव; यवतमध्ये मशिदीवर तोडफोड

Share

अकोला न्यूज नेटवर्क
यवत (ता. दौंड) – सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या आरोपावरून यवत गावात शुक्रवार (1 ऑगस्ट) रोजी मोठा तणाव निर्माण झाला. सकाळी ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास आठवडे बाजार बंद करण्यात आला. त्यानंतर काही अज्ञातांनी गावात मशिदीची तोडफोड केली तसेच दुचाकी गाड्यांना आग लावली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पोस्ट सय्यद नावाच्या युवकाने सोशल मीडियावर शेअर केली होती. तो सहकार नगर भागात राहतो. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला असून संतप्त जमावाने त्याच्या घरावरही हल्ला चढवला. घराची तोडफोड करण्यात आली. मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत मोठा अनर्थ टळवला.

शिवप्रतिमेच्या विटंबनेनंतर दुसरी घटना
मागील आठवड्यात 26 जुलै रोजी यवतमधील नीलकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर वातावरण आधीच तणावपूर्ण होते. अशा परिस्थितीत शुक्रवारी घडलेला नवा प्रकार आणि सोशल मीडियावरून फैलावलेली माहिती गावातील वातावरण अधिकच तापवणारी ठरली.

पोलीस बंदोबस्त वाढवला
घटनेनंतर यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, अतिरिक्त फौजफाटा आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. गावात संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गावकऱ्यांनी घेतला संतापाचा इशारा
घटनास्थळी जमलेल्या काही नागरिकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या. “जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. अशा व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, स्थानिक नेत्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत, असे आवर्जून सांगण्यात आले आहे.

पोलीस सतर्क, सोशल मीडियावर नजर
पोलीस प्रशासनाने सोशल मीडियावर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. अफवांची वा आक्षेपार्ह मजकुराची देवाणघेवाण करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. गावात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी फ्लॅग मार्चही काढला. या घटनेमुळे यवत परिसरात तणाव कायम असून प्रशासनाकडून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!