अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली –‘भारताची निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट झाली आहे, मते चोरीला जात आहेत आणि निवडणूक आयोग यामध्ये सहभागी आहे,’ असा थेट आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. संसद भवन परिसरात शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) पत्रकारांशी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर भाजपासाठी काम केल्याचा आरोप करत ‘तुम्ही निवृत्त व्हा, पण आम्ही तुम्हाला सोडणार नाही’ असा इशाराही दिला.
‘मत चोरण्याची व्यवस्था शोधून काढली’
राहुल गांधी म्हणाले, “महाराष्ट्रात एक कोटी नव्या मतदारांची भर घालण्यात आली. आम्ही निवडणूक आयोगाकडे मदतीची मागणी केली, पण त्यांनी सहकार्य नाकारलं. मग आम्ही स्वतः तपास केला. त्या तपासाला सहा महिने लागले, पण आता आमच्याकडे जे पुरावे आहेत ते ‘अणुबॉम्ब’सारखे आहेत. हे जर बाहेर आलं, तर लोक निवडणूक आयोगावर विश्वास ठेवणार नाहीत.”
‘देशद्रोह आहे हे’
राहुल गांधींचा दावा आहे की, आयोगातील वरपासून खालपर्यंत अनेक अधिकारी मतदार यादीतील फेरफारात सामील आहेत. “तुम्ही भारताविरुद्ध काम करत आहात, हे देशद्रोह आहे. कुठेही लपलात तरी आम्ही तुम्हाला शोधून काढू,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
पुर्वी केलेले आरोपही पुन्हा अधोरेखित
राहुल गांधी यांनी यापूर्वीही महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर मतदार यादीत फेरफार झाल्याचा आरोप केला होता. “आम्हाला व्हिडिओग्राफी दाखवा म्हणालो, तर कायदाच बदलण्यात आला. कर्नाटकात देखील मोठी मत चोरी झाली आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
‘बिहारात नवी योजना?’
राहुल गांधी म्हणाले की, “आता त्यांना कळलंय की आम्हाला त्यांचा खेळ समजला आहे. म्हणूनच बिहारात संपूर्ण मतदार यादी नव्या पद्धतीने तयार करण्याचा निर्णय घेतला गेला. हे मतं हटवण्याचे आणि नवे बनवण्याचे षड्यंत्र आहे.”
भविष्यात मोठा खुलासा होणार?
“आम्ही लवकरच संपूर्ण यंत्रणा समोर आणणार आहोत. एक मतदारसंघ निवडून त्यातल्या सगळ्या घडामोडी उघड केल्या आहेत. आता त्यांनी भीतीने हालचाली सुरू केल्या आहेत,” असंही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.