WhatsApp

मालेगाव निकालावर ओवैसींची तीव्र प्रतिक्रिया; “निर्णय निराशाजनक, आरोपी निर्दोष तर मग दोषी कोण?”

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व आरोपींना न्यायालयाने तब्बल १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्त केल्यानंतर AIMIM पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या निकालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “कोर्टाचा निकाल अत्यंत निराशाजनक आहे. आरोपी निर्दोष सुटले, पण मग त्या सहा मृतांचा दोषी कोण?” असा थेट सवाल ओवैसी यांनी केला आहे.



२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये मशिदीजवळ स्फोट होऊन ६ नमाज पढणाऱ्या नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, ले. कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासह इतरांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र एनआयएने आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याचे कारण देत कोर्टाने सर्वांना निर्दोष मुक्त केले.

ओवैसी म्हणाले की, “या खटल्यात पीडितांना न्याय मिळालेला नाही. त्यांना त्यांच्या धर्मामुळे टार्गेट करण्यात आलं. एनआयएचा तपास दुर्बळ होता हे स्पष्ट आहे. २०१६ मध्ये सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी आरोप केला होता की एनआयएने दबाव टाकून सौम्य भूमिका घेण्यास सांगितले होते.”

ते पुढे म्हणाले, “सरकारने मुंबई लोकल बॉम्बस्फोट खटल्यात अपील केलं होतं. मग या प्रकरणातही अपील करणार का? महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्ष पक्ष यावर आवाज उठवणार का? मारेकरी कुठे आहेत हे जनतेला कळायलाच हवं.”

या प्रकरणामुळे केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांवर नवा वादंग निर्माण झाला असून, ओवैसींसह अनेकांनी या खटल्याच्या निकालावर सवाल उपस्थित केले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!