अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत चौथ्या फेरीनंतरही ५ लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असून, केवळ ८३,९४४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याचे चित्र आहे. मुंबईत देखील केवळ १८,४७४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून उर्वरित विद्यार्थ्यांना पुढील फेरीची वाट पहावी लागणार आहे. नामवंत महाविद्यालयांच्या पसंतीला प्राधान्य देताना कमी गुणांच्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे.
राज्यभरातून १४,२९,२३४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन माध्यमातून प्रवेशासाठी नोंदणी केली होती. यापैकी पहिल्या दोन नियमित फेरींत ७,२०,६६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तिसऱ्या फेरीत १,११,२३५ विद्यार्थ्यांना जागा मिळाली असून त्यातील ९३,०६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. परिणामी, तीन फेऱ्यांनंतर एकूण ८,१३,७२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले.
बुधवारी जाहीर झालेल्या चौथ्या फेरीत राज्यभरात केवळ ८३,९४४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. मुंबईत १८,४७४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नामांकित महाविद्यालयांतील शाखांमध्ये कट-ऑफमध्ये वाढ झाल्याने कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे पर्याय कमी पडत आहेत. एचआर कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा तिसऱ्या फेरीत कट-ऑफ ९८ टक्के होता. चौथ्या फेरीत विल्सन कॉलेजच्या कला शाखेचा कट-ऑफ ७१.४ टक्के, तर रुपारेल कॉलेजमध्ये तो ८५.२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय प्राप्त झाले आहे, त्यांनी २ ऑगस्टपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा. दरम्यान, कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीक्रमाचा पुनर्विचार करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा प्रवेश न मिळण्याची शक्यता वाढू शकते.