अकोला न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२६ फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसाठी खासगी परीक्षार्थींना प्रवेश देण्यासाठी १७ नंबरचा अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना १ ऑगस्टपासून ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार असून, यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क वेळेत भरावे लागणार आहे. मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी याबाबतचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडतात, काम करतात किंवा इतर कारणांमुळे नियमित शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून, दहावी किंवा बारावी परीक्षा खासगीरित्या देता येते. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, विद्यार्थ्यांनी मंडळाच्या mahahsscboard.in या संकेतस्थळावरील ‘स्टुडंट कॉर्नर’ या विभागातून अर्ज भरायचा आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
- शाळा सोडल्याचा दाखला (किंवा त्याचा पर्याय म्हणून द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र)
- आधारकार्ड
- पासपोर्ट साइज फोटो
- ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर
- अर्ज व शुल्क भरल्याची पावती (२ प्रतीत)
विद्यार्थ्यांनी ही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची असून, भरलेला अर्ज आणि शुल्काची पावती निवडलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायची आहे.
शुल्क तपशील:
- दहावी परीक्षा: ११०० रुपये + १०० रुपये प्रक्रिया शुल्क (विलंब शुल्क १०० रुपये अतिरिक्त)
- बारावी परीक्षा: ११०० रुपये + १०० रुपये प्रक्रिया शुल्क (विलंब शुल्क १०० रुपये अतिरिक्त)
- शुल्क भरणे फक्त ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे.
अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत विद्यार्थ्यांच्या ई-मेलवर पाठवली जाईल. याची प्रिंट आउट, शुल्क पावती, हमीपत्र अशा सर्व गोष्टींच्या दोन प्रती विद्यार्थ्यांनी स्वतःजवळ ठेऊन द्याव्यात, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. १७ नंबर अर्ज हा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा सहभागी होण्याची संधी देणारा उपक्रम असून, मंडळाच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.