WhatsApp

भारतावर 1 ऑगस्टपासून 25% टॅरिफ लागू, ट्रम्प सरकारचा कठोर निर्णय

Share

अकोला न्यूज नेटवर्क
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाचे मुख्य दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या रशियाशी असलेल्या उर्जा आणि संरक्षण क्षेत्रातील संबंधांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, 1 ऑगस्ट 2025 पासून भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इतकंच नव्हे तर, अतिरिक्त दंड आकारण्याचाही इशारा दिला आहे.



Truth Social या स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ट्रम्प म्हणाले, “भारत हा आपला मित्र असला, तरी त्याचे आयात शुल्क जगात सर्वाधिक असून, त्यांच्या अडथळ्यांमुळे अमेरिकन कंपन्यांना भारतात शिरकाव करताच येत नाही.”

या निर्णयामागील दोन प्रमुख कारणे ट्रम्प यांनी स्पष्ट केली आहेत – पहिलं म्हणजे भारताचं रशियाकडून मोठ्या प्रमाणावर होणारं तेल व लष्करी सामग्रीचं आयात करणं, आणि दुसरं म्हणजे भारताचं ‘गैर-आर्थिक’ अडथळ्यांचं व्यापार धोरण.

ट्रम्प पुढे म्हणाले की, “युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि युरोपियन देश रशियावर आंतरराष्ट्रीय दबाव टाकत असताना भारताचा रशियासोबतचा स्नेह कायम आहे. भारत हा रशियाचा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक आहे आणि लष्करी खरेदीदार देखील.”

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका-भारत दरम्यान मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप कोणतीही ठोस सहमती न झाल्यामुळे ट्रम्प यांनी थेट टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अमेरिकन कंपन्यांना भारतात प्रवेश मिळावा, या उद्देशाने दबाव वाढवण्याचा प्रयत्न दिसतो आहे.

विशेष म्हणजे याच वर्षी 2 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी 26 टक्के आयात शुल्क लावले होते, परंतु काही आठवड्यांतच ते तात्पुरते मागे घेण्यात आले होते. मात्र, आता त्यांनी अधिक ठोस आणि दीर्घकालीन शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे.

या निर्णयामुळे भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः टेक्सटाइल्स, औषधे, स्टील, ऑटो पार्ट्स आणि कृषी उत्पादनं यावर थेट परिणाम होऊ शकतो. अमेरिका हे भारतासाठी एक प्रमुख निर्यात बाजार असून, सरकारने या निर्णयाकडे गांभीर्याने पाहून नव्याने वाटाघाटींची दिशा ठरवावी लागणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!