अकोला न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नांदणी येथील ऐतिहासिक जैन मठातून हत्ती ताब्यात घेण्याच्या कारवाईनंतर निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर आता ग्रामस्थ, भाविक आणि जैन समाजाच्या भावनांचा उद्रेक थेट संबंधित उद्योजकाच्या भ्रमणध्वनी सेवेकडे वळला आहे. या सेवेला बहिष्कार टाकण्याचे आंदोलन स्थानिकांनी हाती घेतले असून, कोल्हापूरसह सीमावर्ती भागात हे लोण वेगाने पसरत आहे.
शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे असलेल्या जैन मठामध्ये दोनशे वर्षांची हत्ती पालनाची परंपरा आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार आणि वन्यजीव संरक्षण कायद्याच्या आधारे, या मठातील हत्तीचा ताबा घेऊन त्याला गुजरातमधील वनतारा प्राणी संग्रहालयात नेण्यात आले. संबंधित प्राणी संग्रहालय हा रिलायन्स उद्योगसमूहाचे अनंत अंबानी यांच्या मालकीचा भाग असल्याने स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
या प्रकरणात स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांनी पोलिस बंदोबस्तात आलेल्या पथकाला अडवण्याचा प्रयत्न केला होता. दगडफेकीच्या घटनांमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर पोलिस बंदोबस्तात हत्ती गुजरातला रवाना करण्यात आला.
मात्र, या घटनेनंतरही नाराजी कायम असून त्याचे रूप आता आर्थिक बहिष्काराच्या दिशेने वळले आहे. बुधवारी नांदणी व परिसरातील नागरिकांनी संबंधित उद्योजकाच्या मोबाईल नेटवर्क सेवेवर बहिष्कार जाहीर करत, सिम कार्ड रद्द करण्यास सुरुवात केली. काही नागरिकांनी थेट कंपनीच्या सेवाकेंद्रात जाऊन आपली सेवा बंद करण्याची विनंती केली.
या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धी कंपन्यांनी संधीचा लाभ घेत नांदणी परिसरात आपली तात्पुरती विक्री केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांवर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. काही ठिकाणी ग्राहक रांग लावून सिम कार्ड घेत असल्याचे चित्र दिसले.
संबंधित मोबाईल सेवा कंपनीने आता नुकसान नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले असून, स्थानिक प्रतिनिधींमार्फत सेवेच्या लाभांविषयी माहिती देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, ग्रामस्थांचा रोष लक्षात घेता ही मोहिम कितपत यशस्वी ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.