अकोला न्यूज नेटवर्क
बंगळूर | कर्नाटकातील हिजाब वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटकच्या केंद्रीय विद्यापीठातील (सीयुके) सहायक प्राध्यापक अब्दुल मजीद यांनी शैक्षणिक सहलीदरम्यान बी.ए.च्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना प्रार्थनास्थळी हिजाब घालण्यास भाग पाडल्याचा आरोप होत आहे. हैदराबाद येथील कायदेशीर हक्क संरक्षण मंचाचे सरचिटणीस ए. संतोष यांनी २६ जुलै रोजी या प्रकरणी विद्यापीठाकडे तक्रार दाखल केली.
विद्यापीठाचे कुलसचिव आर. आर. बिरादार यांनी या तक्रारीची पुष्टी करत सांगितले की, “विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. चौकशीत प्राध्यापक दोषी आढळल्यास त्यांच्यावर नक्कीच आवश्यक ती कारवाई केली जाईल.”
तक्रारीनुसार, अब्दुल मजीद यांनी ऐच्छिक शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थ्यांना एका प्रार्थनास्थळी प्रवेश मिळवण्यासाठी हिजाब घालण्यास सक्ती केली होती. हा प्रकार शैक्षणिक स्वातंत्र्य व धार्मिक निवडीच्या अधिकाराच्या विरोधात असल्याचे संतोष यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, १५ जुलै रोजी जम्मू आणि काश्मीर स्टुडंट्स असोसिएशन (जेकेएसए) नेही कर्नाटकातील आणखी एका घटनेबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. बंगळूरमधील श्री सौभाग्य ललिता कॉलेज ऑफ नर्सिंगच्या व्यवस्थापनाने हिजाब अथवा बुरखा घातल्यास विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश नाकारण्याची आणि शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित महाविद्यालय राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न आहे.
या घडामोडींमुळे राज्यातील धार्मिक असहिष्णुता व शिक्षणातील समानतेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. हिजाबवरील बंदी व त्यावरील सक्ती या दोन्ही टोकाच्या भूमिका समाजात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरण्याची चिन्हं आहेत. राज्य सरकार व विद्यापीठ प्रशासन यांच्यावर निष्पक्ष कारवाईची जबाबदारी आता येऊन ठेपली आहे.