अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दुजोरा देत पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश कायम ठेवले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या निर्णयाची माहिती ट्विट करत दिली असून, त्यांनी हा निकाल पीडित कुटुंबीयांच्या न्यायासाठीचा महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे राज्य सरकार अडचणीत सापडले असून, पुढील कारवाईकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांना 10 डिसेंबर 2024 रोजी संविधानाच्या प्रतीकृतीच्या विटंबनेनंतर झालेल्या परभणीतील हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आली होती. 15 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले होते, मात्र शवविच्छेदन अहवालात “बहुपक्षीय जखमांनंतरचा शॉक” हे मृत्यूचे कारण नमूद झाले होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत पोलीस जबाबदार असल्याचा संशय वाढला होता.
या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांनी न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. मात्र, राज्य सरकारने त्यावर कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. परिणामी, याचिकादारांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेशही अद्याप प्रभावी राहणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत ट्विट करत म्हटले की, “महाराष्ट्र राज्य व इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे.”
या निकालामुळे कोठडीत झालेल्या मृत्यूबाबत पोलिसांची जबाबदारी ठरवण्याचा मार्ग मोकळा झाला असून, याप्रकरणी पुढे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर राज्य सरकारची भूमिका काय असेल आणि कारवाईची दिशा कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
        
			
        
        
        




