अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : ग्रामीण भागातील महिला बचतगटांना त्यांच्या उत्पादनांसाठी स्थिर व अधिक परिणामकारक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी ग्रामविकास विभागाच्या ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ किंवा जिल्हा विक्री केंद्रे उभारण्यात येणार आहेत. मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला २०० कोटी रुपयांच्या निधीसह मंजुरी देण्यात आली.
या उपक्रमाचा उद्देश महिला उद्यमशीलतेला चालना देणे आणि स्थानिक उत्पादनांना स्थानिक व राष्ट्रीय स्तरावर विक्रीची संधी मिळवून देणे हा आहे. पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांत ही मॉल्स कार्यान्वित करण्यात येणार असून, पुढे ही योजना इतर जिल्ह्यांमध्ये विस्तारली जाणार आहे.
प्रत्येक जिल्हा विक्री केंद्रासाठी कमाल २० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ही केंद्रे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जमिनीवर उभारली जातील. या केंद्रात महिलांना एकात्मिक गाळे, प्रशिक्षणासाठी स्वतंत्र सभागृह व विपणनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. गाळ्यांचे वाटप चक्राकार पद्धतीने करण्यात येणार आहे, जेणेकरून सर्व गटांना संधी मिळेल.
या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतील. आराखड्याची आखणी, निविदा प्रक्रिया आणि केंद्र उभारणीचा संपूर्ण कारभार यांच्याच माध्यमातून होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी घेतली जाईल. जिल्हा परिषदांकडून या मॉलसाठी प्रस्ताव मागवण्यात येणार असून, महिलांना प्रशिक्षण, विपणन व उत्पादने विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.