अकोला न्यूज नेटवर्क
पुणे : अकरावीच्या (FYJC) ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नियमित चौथ्या फेरीसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला ३१ जुलैपासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी ही प्रक्रिया १ व २ ऑगस्ट रोजी नियोजित होती. मात्र, आता ३१ जुलै सकाळी ११ वाजल्यापासून ते २ ऑगस्ट संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करू शकतील.
दरम्यान, चौथ्या फेरीसाठी एकूण ३ लाख ७२ हजार ६५२ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. याशिवाय ७ हजार ५१ नव्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोटा अंतर्गत प्रवेशासाठी १३ हजार ८२९ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरला आहे. याआधीच्या तीन फेऱ्यांमध्ये मिळून ८ लाख ११ हजार ७३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १४ लाख ४१ हजार १८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून, चौथ्या फेरीनंतरही अद्याप काही विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे बाकी राहणार आहे. त्यामुळे उर्वरित जागांसाठी पुढील विशेष फेरी घेतली जाण्याची शक्यता आहे.
चौथ्या फेरीसाठी तातडीने गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असून, विद्यार्थ्यांनी निश्चित केलेल्या महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे. यासोबतच सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी ११ ऑगस्टपूर्वी वर्ग सुरु करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.