WhatsApp

समुद्राखाली ३० भीषण धक्के! रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप, अमेरिका-जपानला त्सुनामीचा धोका

Share

अकोला न्यूज नेटवर्क
रशियाच्या पूर्वेकडील कामचटका भागात मंगळवारी सकाळी ८.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर पुढील तीन ते चार तासांत तब्बल ३० हून अधिक भूकंपाचे सौम्य आणि मध्यम तीव्रतेचे झटके बसले आहेत. या हादर्‍यांमुळे पॅसिफिक महासागरालगतच्या देशांमध्ये त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रशियासह अमेरिका, जपान, चिली, इक्वेडोर आणि हवाईसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.



कामचटका भाग हा भूकंपसदृष्य क्षेत्र म्हणून ओळखला जातो. येथे मागील काही महिन्यांपासून हालचाली सुरू होत्या. मात्र मंगळवारीचा भूकंप हा १९५२ नंतरचा सर्वात तीव्र भूकंप असल्याचे भूगर्भशास्त्रज्ञ सांगत आहेत. १९५२ साली येथे ९ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता.

भूकंपानंतर हवाईमध्ये तब्बल ६ फूट उंच लाटा उसळल्या असल्याची माहिती गव्हर्नर जोश ग्रीन यांनी दिली. स्थानिक प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यावरून लोकांना हटवण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी समुद्रकिनारे पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. हवाईतील काही भागात तीन ते १२ फूट उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जपानमधील चिबा शहरातील कुजुकुरी बीच परिसरात त्सुनामीच्या लाटा दिसू लागल्या आहेत. होक्काइडोमध्ये त्सुनामीचा इशारा देत नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला आहे. अनेकजण इमारतींच्या वरच्या मजल्यांवर स्थलांतरित झाले आहेत. एकूण १६ ठिकाणी त्सुनामी लाटा आल्याची नोंद झाली आहे.

Watch Ad

इक्वेडोरमध्येही तीन मीटरपेक्षा जास्त उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच सोलोमन बेटं, चिली आणि जपानमधील किनाऱ्यांना धोका असल्याचे प्रशासकीय यंत्रणांनी सांगितले आहे. सुरुवातीला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासाठीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता, मात्र त्यांना आता तातडीचा धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे.

कामचटका भागात याच महिन्यात पाचवेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या दरम्यान भूगर्भतज्ज्ञांनी भविष्यात आणखी मोठे हादरे येण्याची शक्यता नाकारलेली नाही. या घटनेमुळे पॅसिफिक किनारपट्टीच्या अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा त्सुनामी आणि भूकंप विषयक सुरक्षाव्यवस्थांचा आढावा घेतला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!