अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातल्या ९ जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा देत भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाथा आणि सखल भागांमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा तसेच नद्यांना पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मुंबई वेधशाळेनं पुढील तीन दिवस मुंबई किनारपट्टीवर ३.७ ते ४.२ मीटर उंच लाटा उसळण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे लहान होड्यांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून, तातडीच्या उपाययोजनांसाठी प्रशासन अलर्टवर आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणातून २४,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे आर्वी बेटाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे, परिणामी या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून, नागरिकांना हवामान खात्याच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.