अकोला न्युज नेटवर्क दिनांक ४ मार्च २०२४ :- वाशिम नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने वाशिमकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने आसमंत निनादून गेले होते.
सोहळ्याला संभाजीराजे छत्रपती, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ऍड. किरण सरनाईक, माजी मंत्री महादेवराव जानकर, गोपीकिशन बाजोरिया, विभागीय आयुक्त डॅा. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, पोलीस अधीक्षक अनुज तारे, सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर आदी सोहळ्याला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळकरी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याद्वारे मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि मान्यवरांचे स्वागत केले. सोहळ्याला स्थानिक नागरिक, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या कामासाठी नगरपरिषदेमार्फत १.२५ कोटी खर्च करण्यात आला आहे. हा पुतळा जमिनीपासून ३५ फूट उंच तर अश्वारुढ पुतळा १३ फूट उंच असल्याची माहिती देण्यात आली.