अकोला न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांनी महाडीबीटी (MahaDBT) संकेतस्थळावर अभ्यासक्रम व शुल्कासह सर्व माहिती वेळेत आणि अचूक भरणे आवश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले आहेत. अन्यथा विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागांतर्फे राबवण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांची प्रक्रिया महाडीबीटी संकेतस्थळावरून ऑनलाइन केली जाते. उच्च शिक्षण संचालनालयाच्या १४ शिष्यवृत्ती योजना यामार्फत दिल्या जातात. यासाठी संबंधित महाविद्यालय आणि विद्यापीठांची अकादमिक, प्रशासकीय व आर्थिक माहिती अद्ययावत असणे अत्यावश्यक आहे.
यामध्ये महाविद्यालयाचे नाव, पत्ता, प्राचार्य व लिपिकांची नावे व संपर्क क्रमांक, चालू अभ्यासक्रमांची यादी, त्यांचे कालावधी व शुल्क यांचा समावेश आहे. १७ जून २०२५ पासून ही माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून १ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत आहे.
याशिवाय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांमध्ये १६ प्रकारच्या शुल्क घटकांचा लाभ देण्यात येतो. मात्र महाडीबीटी संकेतस्थळावर सध्या फक्त १० घटकांची माहिती भरता येते. त्यामुळे उर्वरित शुल्क घटकांची माहिती स्वतंत्रपणे भरून ती विभागीय सहसंचालक, शिक्षण शुल्क समिती व शुल्क नियामक प्राधिकरणाकडून प्रमाणित करून घ्यावी लागेल.

महत्त्वाचे म्हणजे, महाविद्यालयाने नमूद केलेला अभ्यासक्रम कालावधी जितका असेल त्यापेक्षा दोन वर्षे अधिक कालावधीचा शुल्क डेटा भरावा लागेल. एकदा विभागाच्या मंजुरीनंतर ही माहिती महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केली जाते आणि त्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही.
शिष्यवृत्ती मंजुरीसाठी ही माहिती एकमेव आधार मानली जाणार असल्याने, चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास विद्यार्थ्यांचा आर्थिक लाभ अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांनी या सूचनांची गांभीर्याने अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.