अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोर अजूनही मोकाट असताना ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी ठरल्याचे सरकारचे दावे चुकीचे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सोमवारी केला. या हल्ल्याची सखोल चौकशी करून संसदेत अहवाल मांडण्याची मागणीही त्यांनी केली. कारगिल युद्धानंतर अटल बिहारी वाजपेयी सरकारने तयार केलेल्या अहवालाचा दाखला देत त्यांनी वर्तमान सरकारनेही तत्सम जबाबदारी घ्यावी, असे स्पष्ट केले.
लोकसभेत झालेल्या चर्चेत सुळे यांनी सरकारवर रोखठोक सवालांची सरबत्ती करत पीडित कुटुंबियांची वेदना मांडली. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांची उदाहरणे देत, “हल्लेखोर कसे आले, गेले, अजून सापडले का नाहीत, या प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्या,” अशी मागणी त्यांनी केली. सरकारने जाहीर केलेल्या नोकरीच्या आश्वासनाचाही अद्याप履 ठावठिकाणा नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
त्याचबरोबर एमपी सरकारमधील महिला मंत्र्याविषयी झालेल्या टीकेपासून, परराष्ट्र सचिवांच्या मुलीला ट्रोल केल्याच्या घटनांपर्यंत विविध मुद्द्यांवर त्यांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले. सुळे म्हणाल्या, “केंद्र सरकारच्या भूमिकेकडून देशवासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांना न्याय दिला पाहिजे.”
तेजस्वी सूर्या यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत सुळे यांनी भारतीय सैन्याच्या ऐतिहासिक कामगिरीची यादी सभागृहात वाचून दाखवली. सूर्या यांनी नेहरूंनी सैन्याला कधीच प्रोत्साहन दिले नाही, असे वक्तव्य केल्यावर सुळे यांनी सांगितले की, अशा चुकीच्या विधानांमुळे शहीद जवानांचा आणि देशाच्या इतिहासाचा अपमान होतो.
चर्चेच्या अखेरीस त्यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळात विरोधी पक्षांचा समावेश केल्याबद्दल सरकारचे आभार मानले. मात्र एकाच वेळी सरकारची जबाबदारीही अधोरेखित करत हल्लेखोरांना शोधून काढण्याची आणि पीडितांना न्याय देण्याची मागणी त्यांनी ठामपणे मांडली.