अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रात रस्ते अपघातांचा धोका कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राज्य वाहतूक विभागाने नुकतीच जाहीर केलेली आकडेवारी ही धक्कादायक असून, जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत राज्यात एकूण ७,६९५ अपघात झाले असून त्यात तब्बल ८,२७६ जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत गंभीर जखमींची संख्या १२,०६८ वर पोहोचली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांत किरकोळ वाढ झाली असून २०२४ मध्ये याच कालावधीत ७,६७४ अपघात नोंदवले गेले होते. मात्र मृत्यू व गंभीर जखमींच्या संख्येमध्ये वाढ स्पष्टपणे जाणवते. एकूण प्राणघातक अपघातांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत २१ ने वाढल्याची अधिकृत नोंद आहे.
राज्यात ४ कोटीहून अधिक वाहने नोंदणीकृत आहेत. दरवर्षी ३५ हजारांहून अधिक अपघात घडतात व १५ हजारांहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडतात. रस्त्यांचे जाळे वाढले असले तरी सुरक्षा उपाययोजनांमध्ये सुधारणा झाली नसल्याने रस्ते अपघात हे गंभीर आव्हान ठरत आहे.
वाहतूक विभागानुसार वेगमर्यादा न पाळणे, हेल्मेट व सीटबेल्टचा अभाव, मोबाइलवर बोलताना वाहन चालवणे, रस्त्यांचे खराब स्वरूप, अयोग्य रस्ता अभियांत्रिकी, जुनी वाहने आणि नियमांकडे दुर्लक्ष या सर्व गोष्टी अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. विशेषतः शहरी व निमशहरी भागांत उलट दिशेने वाहन चालवणे हे अपघाताचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे कारण बनले आहे.
राज्य सरकारकडून रस्ते सुरक्षेसाठी विविध मोहिमा राबविल्या जात असल्या तरी त्यांचा परिणाम प्रभावीपणे दिसून येत नाही. वाहनचालकांच्या व शासन यंत्रणांच्या समवेतच स्थानिक स्वराज्य संस्थांनीही रस्ता सुरक्षेच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.