अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नवी नियमावली जाहीर केली असून त्यात कर्मचाऱ्यांना काय करावे आणि काय करू नये याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरोधात शिस्तभंग कारवाई केली जाणार आहे.
या नव्या नियमावलीनुसार, सरकारी गोपनीय माहितीचा सोशल मीडियावर प्रसार, शासनविरोधी किंवा दिशाभूल करणारे पोस्ट्स, राजकीय मुद्द्यांवर खुलेपणाने भाष्य करणे, अथवा सामाजिक सलोखा बिघडवणारी मते व्यक्त करणे यास कडक प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
तसेच, शासकीय धोरणांविरोधात टीका करणे, कार्यपद्धतीबाबत नकारात्मक चर्चा करणे किंवा खात्याच्या निर्णयांविषयी समाजमाध्यमांवर भूमिका मांडणे यास शासनाने स्पष्टपणे निषिद्ध घोषित केले आहे.
या सूचनांचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईचा सामना करावा लागणार आहे. राज्यातील सर्व शासकीय विभागांनी या परिपत्रकाची अंमलबजावणी सुरू केली असून अधिनस्त कर्मचाऱ्यांना नियमावलीचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.