अकोला न्यूज नेटवर्क
सतना (मध्य प्रदेश) – एका सरकारी कागदाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील कोठी तहसील कार्यालयाने जारी केलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रात एका व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न केवळ ३ रुपये दाखवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रमाणपत्र तहसीलदार सौरभ द्विवेदी यांच्या स्वाक्षरीने अधिकृतपणे २२ जुलै २०२५ रोजी जारी करण्यात आले.
कोठी तहसीलमधील नयागाव गावातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीसाठी हे प्रमाणपत्र तयार करण्यात आले होते. सोशल मीडियावर हे प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, “भारतातील सर्वात गरीब व्यक्ती कोण?” असा सवाल चर्चेत आहे.
या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या चुकीसह प्रमाणपत्र कसे जारी झाले, यावरून सरकारी प्रक्रिया किती अचूक आहे यावर लोकांनी टीका केली आहे.
दरम्यान, तहसीलदार सौरभ द्विवेदी यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, “ही चूक क्लर्ककडून झाली होती. आता ते प्रमाणपत्र रद्द करून योग्य माहिती असलेलं नवं प्रमाणपत्र देण्यात आलं आहे.”
मात्र, ही चूक फक्त clerical असल्याचं सांगून प्रशासनाने जबाबदारी झटकली असली, तरी मध्य प्रदेश काँग्रेसने सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “सरकार जनतेला गरीब बनवण्याच्या मोहिमेत आहे का?” असा सवाल काँग्रेसने केला आहे.
या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाच्या प्रणालीवर संशय व्यक्त केला जात असून, अशा चुका पुढे थेट योजनांच्या लाभांवर परिणाम करू शकतात, अशी चिंता स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.