WhatsApp

संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर १६ तासांची मंथनसभा; सरकार-विरोधक आमनेसामने

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ७ मे रोजी राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर आता संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकत्र १६ तासांची विस्तृत चर्चा होणार आहे. लोकसभेत सोमवारपासून दुपारी १२ वाजता सुरुवात होणारी ही चर्चा मंगळवारी राज्यसभेत होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील चर्चेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



या चर्चेची मागणी विरोधकांकडून वारंवार करण्यात येत होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, देशाने ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सविस्तर माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी सरकारने अखेर तयारी दर्शवत चर्चेसाठी वेळ निश्चित केला आहे. लोकसभेतील चर्चा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने सुरू होईल.

राजनाथ सिंह यांनी या चर्चेपूर्वी लष्करी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी – संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही लष्करप्रमुख, आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्यासह – महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अमित शहा, एस जयशंकर, अनुराग ठाकूर आणि निशिकांत दुबे हे देखील चर्चेत भाग घेणार आहेत.

सरकारच्या दाव्यानुसार, ७ मे रोजी राबवले गेलेले ऑपरेशन सिंदूर अवघ्या २२ मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. सर्व दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला आणि एकही भारतीय जवान हुतात्मा झाला नाही, अशी माहिती संरक्षण विभागाने दिली आहे.

मात्र, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर विरोधी पक्षांनी या कारवाईतील तथ्य, गुप्तचर यंत्रणांची भूमिका, आणि सुरक्षाव्यवस्थेतील संभाव्य त्रुटींबाबत सविस्तर खुलासा मागितला आहे. याच पार्श्वभूमीवर संसदेतील पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न असणार आहे.

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते की, “सरकारकडे लपवण्यासारखे काहीच नाही. सर्व सत्य संसदेत मांडले जाईल.” त्यामुळे येणाऱ्या चर्चेवर देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!