अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मराठी माणसाला उद्देशून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी आता मराठी रागाचा प्रत्यक्ष धसका घेतल्याचे चित्र समोर आले आहे. नवीन महाराष्ट्र सदनात आज आयोजित करण्यात आलेल्या संसदरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यास दुबे यांना पुरस्कार मिळणार असूनही ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीमागचे खरे कारण काय, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
दुबे यांनी काही आठवड्यांपूर्वी ‘पटक पटक के मारेंगे’ अशा प्रकारची भाषा वापरत मराठी माणसाबाबत अपमानजनक वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. संसद भवनात देखील महाराष्ट्रातील महिला खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव व प्रतिभा धानोरकर यांनी त्यांना जाब विचारला होता.
आजचा संसदरत्न पुरस्कार सोहळा महाराष्ट्र सदनात होत असल्याने, दुबेंना मराठी जनतेसमोर जाणं टाळावं लागलं असावं, अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काही पत्रकारांशी बोलताना काही उपस्थितांनी म्हटलं की, “दुबे आले असते, तर त्यांना इथेच ‘प्रसाद’ मिळाला असता.”
दुबे यांच्या अनुपस्थितीमुळेच दुसरी एक घटना चर्चेत आली ती म्हणजे, गोरखपूरचे खासदार आणि अभिनेते रविकिशन यांनी कार्यक्रमात मराठीमध्ये संवाद साधला. पत्रकारांनी मराठीत प्रश्न विचारल्यावर रविकिशन यांनी कोणतीही अडचण न घेता मराठीत उत्तर दिलं. “मी गोरेगावात राहतो. मुंबईने मला खूप दिलं,” असं म्हणत त्यांनी मराठीशी असलेली आपली जवळीक दाखवून दिली.
दुबे यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा राजकीय व सामाजिक टीका सुरू झाली आहे. मराठी अस्मितेचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र जनतेकडून वेळोवेळी प्रत्युत्तर मिळत असल्याचं यावरून स्पष्ट होतं.