अकोला न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावात रविवारी सकाळी घडलेल्या एका नाट्यमय घटनेत एक बिबट्या गावातील कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला आणि त्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. कोंबड्या फस्त करण्यासाठी आलेल्या बिबट्याला गावकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे जीवंत पकडण्यात यश मिळालं.
ही घटना रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. मधुकर कुंभार यांच्या घराजवळ असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या शिरला आणि त्याने काही कोंबड्यांचा फडशा पाडला. याची चाहुल त्यांच्या नातवंडांपैकी अवधूतला लागली. त्याने त्वरित खुराड्याच्या दिशेने धाव घेतली. आत बिबट्या असल्याचे लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत खुराड्याचा दरवाजा बंद केला आणि बिबट्याला आतच अडकवले.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, तसेच पोलीस कर्मचारी संदेश जाधव, सोमनाथ खाडे, गिरप्पा लोखंडे, सिद्धेश आंबरे, अरुण वानरे, रमेश गावित यांनी तत्काळ मदत केली.
वनविभागाचे वनपाल न्हानू गावडे आणि त्यांचे सहकारी वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडुकर, सुप्रिया काळे, किरण पाचर्णे आणि शर्वरी कदम यांनी बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडून पिंजऱ्यात बंद केले. परिसरात बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तात्काळ कारवाईमुळे बिबट्याला कोणतीही हानी न पोहोचता सुरक्षितपणे पकडण्यात यश आले. बिबट्याला नंतर जंगलात सोडण्याची प्रक्रिया वनविभाग करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.