अकोला न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात प्रेमाच्या मुखवट्याआड लपलेला एक भयंकर गुन्हा उघडकीस आला आहे. अनिल गोविंदा संदानशिव या नराधमाने दोन महिलांचा खून केला असून तिसऱ्या महिलेचा प्रयत्न अपयशी ठरल्याने ती थोडक्यात बचावली आहे. या गुन्ह्यांनी जळगाव हादरलं असून पोलिसांच्या तपासाने एक सिरीयल किलरचे रूप समोर आले आहे.
अनिल संदानशिव हा सोज्वळ वागणूक आणि गोड बोलण्यामुळे महिलांचा विश्वास संपादन करत असे. एकदा विश्वास बसल्यावर त्यांच्याशी संबंध निर्माण करायचे आणि मग जंगलात नेत निर्घृण खून करायचा, असा त्याचा विकृत नमुना होता. शोभाबाई कोळी आणि वैजंयताबाई भोई या महिलांचा खून केल्याची त्याने कबुली दिली आहे. शाहनाज बी या तिसऱ्या महिलेला मारण्याचा प्रयत्न मात्र आरडाओरडमुळे फसला.
वैजंयताबाई भोई यांच्याशी अनिलची ओळख सुरत येथे झाली होती. त्याने प्रेमाच्या नाटकाने त्यांना फसवून जळगावला आणले आणि 2 मे रोजी त्यांचा सुमठाणे जंगलात खून केला. पोलिसांना 23 जुलै रोजी तिचे अवशेष, आधारकार्ड आणि चप्पल मिळाल्यानंतर तिची ओळख पटली.
तत्पूर्वी, 25 जून रोजी शोभाबाई कोळी यांचा मृतदेह सुमठाणे जंगलात गोणीत आढळून आला होता. त्यांच्यावरही डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अनिलला अटक केली आणि त्याने या खुनांची कबुली दिली.
तिसरी महिला शाहनाज बी यांना देखील त्याने फसवण्याचा प्रयत्न केला. जंगलात बोलावून डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या आरडाओरड केल्यामुळे स्थानिकांनी धाव घेतली आणि अनिल तेथून फरार झाला.
या सर्व प्रकरणांनी जळगावमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिस अधिक तपास करत असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.