अकोला न्यूज नेटवर्क
उत्तराखंडातील हरिद्वार येथील प्रसिद्ध मानसा देवी मंदिरात रविवारी सकाळी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या भीषण दुर्घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला असून ३५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मंदिर परिसरात अचानक अफवा पसरली की मंदिराच्या पायऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह आहे. त्यामुळे घाबरलेल्या भाविकांनी धावपळ सुरू केल्याने चेंगराचेंगरी झाली.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मानसा देवी मंदिराच्या मुख्य रस्त्यावर आणि पायऱ्यांवर हजारो भाविकांची गर्दी होती. त्याच दरम्यान ही अफवा पसरल्याने मोठा गोंधळ उडाला. गर्दीत अनेक महिला आणि वृद्ध भाविकही होते. याच अफवेच्या पार्श्वभूमीवर धावपळीला सुरुवात झाली आणि चेंगराचेंगरी झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व प्रशासनाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आपत्ती निवारण पथक, अर्धसैनिक दल आणि स्थानिक स्वयंसेवकांनी बचावकार्य हाती घेतलं. प्रशासनाकडून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये चार जण उत्तर प्रदेशातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेनंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोक व्यक्त करत याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गढवालचे डीसी विनय कुमार यांनी विजेचा धक्का ही दुर्घटनेमागे असल्याचा दावा फेटाळून लावत सांगितले की, ही अफवेमुळे झालेली चेंगराचेंगरी होती. अपघातामागील नेमकं कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच उत्तर प्रदेशातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.