अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मँचेस्टर : भारताचा युवा कर्णधार शुभमन गिलने मँचेस्टर येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आणखी एक शतक झळकावून कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गिलने इंग्लंडमध्ये चालू मालिकेतील चौथे शतक पूर्ण करत १४८ वर्षांच्या कसोटी इतिहासातील अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारताच्या दुसऱ्या डावात त्याने 228 चेंडूंमध्ये 12 चौकारांच्या मदतीने 103 धावा करत चौथे शतक झळकावले.
यापूर्वी गिलने लीड्समध्ये 147, एजबॅस्टनच्या पहिल्या डावात 269 आणि दुसऱ्या डावात 161 धावा केल्या होत्या. या मालिकेत त्याच्या एकूण धावा 722 झाल्या आहेत. विशेष म्हणजे, कसोटी कर्णधार म्हणून आपल्या पदार्पणाच्या मालिकेत चार शतके करणारा तो जगातील पहिला खेळाडू बनला आहे. ख्रिस वोक्सच्या चेंडूवर एक धाव घेत त्याने शतक साजरे केले.
गिलने यासह अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. वॉरविक आर्मस्ट्राँग, सर डॉन ब्रॅडमन, ग्रेग चॅपेल, विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांनी पदार्पणाच्या मालिकेत प्रत्येकी तीन शतके झळकावली होती. मात्र गिलने चौथे शतक ठोकत त्यांच्यावर मात केली.
इंग्लंडमध्ये एकाच मालिकेत कर्णधार म्हणून चार शतके करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. इंग्लंडचा कोणताही कर्णधार मायदेशातही अशी कामगिरी करू शकलेला नाही. यापूर्वी सर डॉन ब्रॅडमन यांनी 1938 मध्ये इंग्लंडमध्ये तीन शतके केली होती. त्यानंतर मेलव्हिल (1947), गॅरी सोबर्स (1966), डेव्हिड गावर (1985), ग्रॅहम गूच (1990) आणि जो रूट (2021) यांनी प्रत्येकी तीन शतके झळकावली होती.

गिलने आता गावसकर आणि कोहली यांच्याही विक्रमाशी बरोबरी केली आहे. गावसकर यांनी 1971 व 1978-79 मध्ये प्रत्येकी चार शतके केली होती, तर कोहलीने 2014-15 मध्ये ऑस्ट्रेलियात ही कामगिरी केली होती.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शुभमन गिल आता कर्णधार म्हणून पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर सर डॉन ब्रॅडमन असून त्यांनी 1936-37 मध्ये 810 धावा केल्या होत्या. गिलने आतापर्यंत 722 धावा केल्या असून एक सामना शिल्लक असल्याने तो हा विक्रमही मोडू शकतो.
ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. शुभमन गिलच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारताला कसोटी मालिकेत निर्णायक आघाडी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे.