अकोला न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘‘पद मिळाले की अनेकांच्या डोक्यात खुर्ची जाते. यासारखे दुसरे पाप नाही,’’ अशा स्पष्ट शब्दांत देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायव्यवस्थेतील काही नवोदित न्यायमूर्ती आणि वकिलांना महत्त्वाचा सल्ला दिला. दर्यापूर येथील नूतन न्यायालयीन इमारतीच्या कोनशिला अनावरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सरन्यायाधीश गवई यांनी आपल्या भाषणात सांगितले की, काही नवोदित प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी चाळीस ते पन्नास वर्षे वकिली करणाऱ्या ज्येष्ठ वकिलांसोबत ज्या पद्धतीने वागतात, ते चुकीचे आहे. त्यांनी एका घटनेचा उल्लेख केला, जिथे एक न्यायाधीश कनिष्ठ वकिलाला इतके रागावून बोलले की तो बिचारा वकील न्यायालयातच बेशुद्ध पडला. “न्यायालयातील वातावरण हे खेळीमेळीचे असले पाहिजे. वकील आणि न्यायाधीश हे न्यायव्यवस्थेची दोन चाके आहेत. दोघेही समान आहेत. वकिलांना वाईट वागणूक देऊन तुमचा अहंकार जपला जात असेल, पण ते तुमचे काम नाही,” असे त्यांनी सुनावले.
या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे, आमदार गजानन लवटे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रवीण पाटील, दर्यापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष धमेंद्र आठवले, जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा तसेच दर्यापूर जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यवान डोके आदी मान्यवर उपस्थित होते.
सरन्यायाधीश भूषण गवई पुढे म्हणाले की, न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा प्राण आहे. यामुळे संविधानाला आदर्श मानून न्यायदानाचे कार्य करावे. या क्षेत्रात अनुभव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. न्यायाधीश आणि वकील यांचे संबंध सलोख्याचे असावे. शासनाने अनेक महत्त्वपूर्ण कायदे लागू केले आहेत. महिला सबळीकरण कायद्यान्वये स्त्रियांना त्यांचा हक्क मिळत आहे. उत्तम न्यायव्यवस्थेमुळे आज आपला देश प्रगतीपथावर आहे. राज्यघटनेचे मौलिक अधिकार आणि जबाबदारी याचे योग्य पालन होणे गरजेचे आहे.