WhatsApp

सासऱ्याच्या काम सांगण्याने संतापली सून, जेवणात विष घालून सासरा-पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न

Share

अकोला न्यूज नेटवर्क
रत्नागिरी :
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील कोसुंब रेवाळेवाडी येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरा घरातील कामे करण्यास सांगतो म्हणून राग आल्याने एका सुनेने चक्क जेवणामध्ये विषारी द्रव्य टाकून सासऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेत पतीलाही विषबाधा झाल्याने सुनेला देवरूख पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जगन्नाथ सोलकर (वय ३४) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या सुनेचे नाव स्वप्नाली सचिन सोलकर (वय ३२) असे आहे. सचिन सोलकर आणि स्वप्नाली सोलकर यांचा १३ एप्रिल २०२५ रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर स्वप्नालीला तिचे सासरे जगन्नाथ सोलकर हे घरातील कचरा काढणे, साफसफाई करणे आणि इतर कामे चांगल्या प्रकारे करण्यास सांगायचे. सासऱ्यांच्या या बोलण्याचा स्वप्नालीला राग आला. याच रागाच्या भरात तिने जगन्नाथ सोलकर यांना जीवे ठार मारण्यासाठी त्यांच्या जेवणामध्ये विषारी द्रव्य घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ते विषारी जेवण सचिन सोलकर यांनीही खाल्ल्याने त्यांनाही विषबाधा झाली. ही घटना २२ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता घडली.

जगन्नाथ सोलकर आणि सचिन सोलकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान, जगन्नाथ सोलकर आणि सचिन सोलकर यांना विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. आता या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले आहे.

सचिन सोलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वप्नाली सोलकर हिच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात शुक्रवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिला तात्काळ ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. कौटुंबिक वादातून घडलेल्या या गंभीर घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!