अकोला न्यूज नेटवर्क
पुणे : “महाराष्ट्राच्या ७० वर्षांच्या इतिहासात जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही, तेवढी बदनामी महायुती सरकारच्या दीडशे दिवसांमध्ये झाली आहे. गाव, वाडी, वस्तीपासून दिल्लीपर्यंत महाराष्ट्राची बदनामी सुरू आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) च्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राज्य सरकारला धारेवर धरले. दर ५० दिवसांनी एखादी ‘विकेट’ जातेय, सरकारने नेमके काय चालवले आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सुळे यांनी पुण्यात पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सचिन दोडके आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते अस्वस्थ असल्याची कबुली दिली असली तरी, ते भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या लोकांवर प्रचंड नाराज असल्याचे सुळे यांनी सांगितले. सुळे म्हणाल्या, “भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षातील लोकांच्या वागणुकीमुळे महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल, अशी परिस्थिती आहे.”
मंत्र्यांच्या वादग्रस्त कृत्यांमुळे राज्याच्या प्रतिमेला तडा
सुळे यांनी महाराष्ट्रातील वाढत्या वादग्रस्त घटनांवर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रातील विधिमंडळात मोबाईलवर पत्ते खेळणे, बॅगेमध्ये रोकड सापडण्यापासून ते कंत्राटदाराच्या आत्महत्येपर्यंतचे प्रश्न आम्हाला इतर राज्यांचे खासदार विचारतात. महाराष्ट्रातील कुठल्याही घटनेची देशभर चर्चा होते, अशा घटना आमच्यासाठी अडचणीच्या ठरतात.” त्या पुढे म्हणाल्या, “आम्ही सत्ताधाऱ्यांचे विरोधक असलो तरी, आमचे महाराष्ट्रावर प्रेम आहे. दररोज मंत्र्यांच्या विकेट जाण्याने आम्हाला आनंद होत नाही. त्यामुळे राज्याचेच मोठे नुकसान होत आहे.”
सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
सांगलीच्या ३५ वर्षीय कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतरही आपला त्याच्याशी काही संबंध नसल्याचे सांगत सरकारने आपली संवेदनशीलता दाखवली आहे, असे सुळे यांनी म्हटले. राज्यात दररोज शेतकरी, शिक्षक, कंत्राटदारांच्या आत्महत्या सुरू असताना सरकारने दीडशे दिवसांत काय काम केले, असा सवाल त्यांनी विचारला. शिक्षकांच्या पगारासाठी सरकारकडे पैसे नसतील, तर ८० हजार कोटी रुपयांचे रस्ते कशासाठी व कोणासाठी, असेही त्यांनी विचारले. संतोष देशमुख, महादेव मुंडे यांच्या हत्या कोणी केली? त्यावेळी कोण पालकमंत्री होते? वाल्मीक कराडचा आका कोण होता? देशमुख व मुंडे यांच्यासारखी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असताना ‘क्लीनचीट’ कसली देत आहात, असे प्रश्न विचारत सुळे यांनी गुन्हेगारीच्या घटनांवरून सरकारला घेरले. हत्येशी संबंध असणाऱ्यांना आम्ही निर्णय प्रक्रियेत येऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.