अकोला न्यूज नेटवर्क
अकोला : सध्या समाजमाध्यमांवर ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावाने काही संदेश वेगाने प्रसारित होत आहेत. यामध्ये १८ वर्षांखालील ज्या मुलांचे १ मार्च २०२० नंतर दोन्ही पालक किंवा एक पालक मृत्यू पावले आहेत, अशा कुटुंबातील दोन मुलांना बाल सेवा योजनेअंतर्गत दरमहा ४ हजार रुपये मिळतील, तसेच यासाठीचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत, अशी चुकीची माहिती दिली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात या नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी स्पष्ट केले आहे.
श्री. पुसदकर यांनी नागरिकांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणतीही आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ही बाब पूर्णपणे अफवा असून, त्यावर विश्वास ठेवल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत आणि सत्य माहितीसाठी नागरिकांनी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाशी किंवा चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गिरीश पुसदकर यांनी केले आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या खोट्या माहितीमुळे नागरिक दिशाभूल होऊ शकतात, त्यामुळे अशा संदेशांची सत्यता पडताळून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.