अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील १७ खासदारांना यंदाचा ‘संसदरत्न पुरस्कार २०२५’ जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या वर्षी महाराष्ट्राने या पुरस्कारात बाजी मारली असून, राज्यातील तब्बल ७ खासदारांनी या प्रतिष्ठित यादीत स्थान पटकावले आहे. संसदेमध्ये उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दरवर्षी ‘प्राईम पॉईंट फाऊंडेशन’ या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो.
या संसदरत्न पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) च्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासह एकूण सात खासदारांची निवड करण्यात आली आहे. संसदेतील त्यांच्या प्रभावी कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
या पुरस्कारांमुळे महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या संसदीय कामकाजातील योगदानावर प्रकाश टाकला गेला आहे. हा पुरस्कार खासदारांना अधिक सक्रियपणे काम करण्यासाठी प्रोत्साहन देतो आणि संसदीय लोकशाही मजबूत करण्यास मदत करतो.