WhatsApp

देशात खळबळ! गाझियाबादमध्ये बनावट ‘वेस्टआर्क्टिका’ दूतावासाचा पर्दाफाश; आरोपीकडे १२ पासपोर्ट, १० वर्षात ४० देशांना भेटी!

Share

अकोला न्यूज नेटवर्क
गाझियाबाद | उत्तर प्रदेश पोलिसांनी गाझियाबाद शहरात एका बनावट दूतावासाचा पर्दाफाश केला असून, या प्रकरणात एकमेव आरोपी आणि सूत्रधार हर्षवर्धन जैन (वय ४७) याला अटक करण्यात आली आहे. कवी नगर भागात हा दूतावास चालवला जात होता. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान जैनबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्याकडे तब्बल १२ डिप्लोमॅटिक पासपोर्ट आढळून आले असून, गेल्या १० वर्षांत त्याने जवळपास ४० देशांना भेटी दिल्या असल्याचे उघड झाले आहे.



उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स (STF) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे जैनच्या गाझियाबादमधील कवी नगर येथील भाड्याच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला आणि त्यानंतर मंगळवारी त्याला अटक करण्यात आली. जैनने आपण ‘वेस्टआर्क्टिका (Westarctica)’चे राजदूत असल्याचा दावा केल्याचा आरोप आहे.

४० देशांना भेटी आणि शेल कंपन्यांचा वापर

“तपासादरम्यान असे समोर आले आहे की जैन हा त्याच्या शेल कंपन्यांच्या व्यवस्थापनासाठी अनेक आखाती आणि युरोपीय देशांना भेटी देत होता,” असे सूत्रांनी सांगितले. त्याने भेट दिलेल्या देशांमध्ये यूएई, मॉरिशस, तुर्की, फ्रान्स, इटली, बल्गेरिया, कॅमेरून, स्वित्झर्लंड, पोलंड, श्रीलंका आणि बेल्जियम यांचा समावेश आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की, “काही कंपन्यांमध्ये त्याने स्वतःचे नाव सेक्रेटरी म्हणून दिले आहे, तर इतर काहींमध्ये स्वतःला डायरेक्टर असल्याचे दाखवले आहे. त्याने जवळपास ४० देशांना भेटी दिल्या आहेत, ज्यामध्ये गेल्या १० वर्षांत ३० फेऱ्या त्याने फक्त यूएईच्या केल्या आहेत.” पोलिसांनी जैनकडून १२ देशांचे डिप्लोमॅटिक पासपोर्ट देखील जप्त केले आहेत.

फसवणुकीचे रॅकेट आणि पुढील तपास

चौकशीचा भाग असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पुराव्यानुसार असे दिसून येते की जैन याने शेल कंपन्यांच्या माध्यमातून बनावट व्यावसायिक सौदे (फेक बिझनेस डील्स) ऑफर करून आणि परदेशात लोकांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे कमावले. त्याने नेमके किती लोकांना फसवलं याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस पथकांकडून केला जात आहे.

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, त्यांनी जैनला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी शहरातील न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अटकेनंतर त्याच्या प्राथमिक चौकशीनंतर मंगळवारी त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गाझियाबादमधून हे फसवणुकीचे रॅकेट चालवण्याशी संबंध असलेले अर्धा डझनहून अधिक लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!