WhatsApp

सावरकरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधी यांना जामीन मंजूर

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नाशिक |
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल फौजदारी स्वरुपाच्या याचिकेच्या सुनावणीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे गुरुवारी दृकश्राव्य माध्यमातून येथील न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.



हिंगोली येथील सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी जाहीरपणे आक्षेपार्ह विधाने केल्याची तक्रार करत निर्भया फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी २०२२ मध्ये येथील न्यायालयात फौजदारी मानहानीची याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी नरवाडिया यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी विरोधी पक्षनेते गांधी यांना हजर रहावे लागेल, असे आदेश न्यायालयाने दिले होते.

नव्या तरतुदीनुसार न्यायालयासमोर व्यक्तीश: हजर न राहता दृकश्राव्य (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातून हजर होता येते. त्यानुसार गांधी यांनी दृकश्राव्य माध्यमातून हजर राहण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयाने संमती दिल्यानंतर गुरुवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दृकश्राव्य माध्यमातून हजर झाले. याबाबतची माहिती त्यांची बाजू मांडणारे ॲड. जयंत जायभावे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांनी दिली.
न्यायालयासमोर दृकश्राव्य माध्यमातून जवळपास १० मिनिटे गांधी हे हजर होते. यावेळी न्यायालयाने त्यांना गुन्हा कबूल आहे काय, अशी विचारणा केल्यावर त्यांनी गुन्हा नाकबूल असल्याचे उत्तर दिले. नंतर त्यांच्या वकिलांनी जामीन मागितला. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर गांधी यांना जामीन मंजूर केल्याचे ॲड. जायभावे यांनी सांगितले. गांधी यांच्यासाठी आशिष छाजेड हे जामीनदार बनले.

याचिकेला आव्हान
मानहानी प्रकरणी दाखल फौजदारी याचिकेला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. ही याचिका कायदेशीर वारसांकडूनदाखल झालेली नाही. यामुळे ती रद्द करण्यासाठी वरिष्ठ न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती ॲड. जायभावे आणि ॲड. छाजेड यांनी दिली.

Watch Ad

Leave a Comment

error: Content is protected !!